|
|
|
१९३८ साली सुरेश खरे यांचा जन्म एका मध्यमवर्गीय
कुटुंबात झाला. वडील पेशाने शिक्षक. आई नुसती शिक्षित नव्हती तर
त्यांचं वाचन अफ़ाट होतं. दोघंही प्रागतिक विचारांची होती. वडील
संगीत नाटकांचे षौकी. बाल गंधर्वांची नाटकं त्यांनी कधी चुकवली
नाहीत. सुरेश खरेंच्या रंगभूमीच्या आकर्षणाचं कारण कदाचित हेच
असू शकेल.
गंमतीची गोष्ट म्हणजे सुरेश खरेंनी नाटकात पहिली भूमिका केली ती
वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी आणि तीही स्त्री भूमिका, मामा वरेरकरांच्या
सत्तेचे गुलाम या नाटकात. शाळेत असतांना त्यांचे शिक्षक श्री मु.अ.
जोशी यांनी त्यांचे कलागुण हेरले. ते जोपासले आणि त्यांना प्रोत्साहन
दिलं. महाविद्यालयात शिक्षण घ्यायला सुरुवात केली. तिथं ते कमलाकर
सारंग यांच्या संपर्कात आले. सारंगांनी नंदकुमार रावते या प्रतिभावान
दिग्दर्शकाशी त्यांची ओळख करुन दिली. आयुष्याला वेगळं वळण देणारी
ही घटना.
|
|
|
|
बी.कॉम, बी.ए., एल.एल.बी. या तीन पदव्या पदरात घेऊन शिक्षण पूर्ण
करुन खरेंनी एका विमा कंपनीत नोकरी धरली. पण आपला नाटकाचा छंद
चालूच ठेवला. ललित कला साधना या हौशी नाट्यसंस्थेच्या स्थापनेत
त्यांनी भाग घेतला. या संस्थेच्या नाटकात त्यांना छोट्या मोठ्या
भूमिका मिळत होत्या. त्यात ते खूष होते. कधी ना कधी आपल्याला मोठी
भूमिका मिळेल अशी आशा होती. त्यांना नट व्हायचं होतं. ते त्यांचं
स्वप्न होतं. पण तसं व्हायचं नव्हतं.
|
|
|
|
मधल्या काळात बबन प्रभूंनी, ज्यांच्या नाटकात खरेंनी छोटीशी भूमिका
केली होती, योगायोगानं खरेंची एक कथा वाचली. ती संपूर्ण कथा संवादांच्या
माध्यमातून लिहीली होती. आकाशवाणीवर निर्माते असलेल्या बबन प्रभूंनी
ती उचलली आणि आकाशवाणीवरुन श्रुतिका म्हणून प्रसारित केली. त्यानंतर
खरे सातत्यानं आकाशवाणीसाठी लिहू लागले. १९६६ साली ललित कला साधनेनं
महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत नवीन नाटक घेऊन उतरायचं ठरवलं.
परंतु कोणताच प्रस्थापित नाटककार त्यांना नवीन नाटक देईना. अखेरीस
नंदकुमार रावतेंनी खरेंनाच नाटक लिहायला सुचवलं. अशा रीतीनं खरेंचं
पहिलं नाटक 'सागर माझा प्राण' १९६६ मध्ये रंगभूमीवर आलं. त्या
पाठोपाठ १९६७ मध्ये 'स्वर जुळता गीत तुटे' आणि १९६९ मध्ये 'काचेचा
चंद्र' रंगभूमीवर आलं. समीक्षक आणि प्रेक्षक दोघांनाही 'काचेचा
चंद्र' हे नाटक आवडलं. त्यानंतर खरेंनी आपलं संपूर्ण लक्ष नाटकावर
केंद्रित करायचं ठरवलं. आज त्यांच्या खात्यावर २९ नाटकं जमा आहेत.
त्यातली काही नाटकं हिंदी, गुजराती, तामिळ, सिंधी, इंग्लीश या
भाषांत रुपांतरित होऊन रंगमंचावर आली. |
|
|
|
next > |
|
|